10 जुलै 2026
आरटीओ कार्यालयात चालकांचे आंदोलन डॉ. ज्योती ठाकरे कथित वक्तव्याचा निषेध, कारवाईची मागणी
सोलापूर, दि. ९ जुलै-
प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शेकडो चालकांनी जोरदार आंदोलन करत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मुलाणी यांना निवेदन सादर केले.
मराठी भाषा प्रमाणपत्रासंदर्भात आयोजित शिबिरामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. ज्योती ठाकरे यांनी धर्माच्या आधारावर भेदभाव करणारे वक्तव्य केल्याचा आरोप महासंघाने निवेदनातून केला आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई
करण्यात यावी तसेच समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद म्हणाले, "मराठी ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची भाषा आहे. ती कोणत्याही एका धर्माची भाषा नाही. माझे शिक्षण म राठी माध्यमातून झाले असून माझ्याकडे महाराष्ट्र राज्य मंडळाचे प्रमाणपत्र आहे. तरीही केवळ मुस्लिम असल्यामुळे स्वतंत्र मराठी भाषा प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार संविधानातील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो."
निवेदन देण्यापूर्वी आणि त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात शेकडो
चालकांनी जोरदार घोषणाबाजी केली. "धर्माच्या नावावर भेदभाव बंद करा", "मराठी सर्वांची भाषा आहे", "दोषींवर तात्काळ कारवाई करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महासंघाच्या वतीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असून आवश्यकतेनुसार तो प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सय्यद यांनी दिला. यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.